(रायगड)
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची धग अजून शांत होत नाही तोच कोकणातही अशाच प्रकारचा धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात जादूटोणा आणि अघोरी विधींच्या नावाखाली एका विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान (रा. कळंबोली, नवी मुंबई) असे असून, त्याच्यावर बलात्कार, फसवणूक आणि धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सांताक्रूझ (मुंबई) येथील पीडित महिला वैवाहिक अडचणींमुळे मानसिक तणावात होती. पतीच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्येवर उपाय मिळावा या आशेने ती आरोपीच्या संपर्कात आली. आरोपीने ‘उपचार’ करण्याचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला खालापूर तालुक्यातील महड परिसरातील एका निर्जन फार्महाऊसवर नेण्यात आले. तिथे मध्यरात्री जादूटोणा आणि अघोरी विधींच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपी अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान हा लोकांना धार्मिक व तात्त्विक गोष्टी सांगत त्यांचा विश्वास जिंकायचा. कधी काळ्या जादूची भीती दाखवून तर कधी ‘दैवी शक्ती’ असल्याचे भासवून तो महिलांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. पीडित महिलांमध्ये विवाहित महिलेसह इतर काही महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. बाबाजान महिलांना त्यांच्या वैयक्तिक अडचणी, कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून मुक्त करण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करत होता. धार्मिक विधींचा आधार घेत त्याने महिलांवर प्रभाव टाकून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर खालापूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला. रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या सूचनेनुसार आरोपीला कळंबोली येथून अटक करण्यात आली. सध्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यात वाढती भोंदूगिरी, नागरिकांत संताप
नाशिकमधील प्रकरणानंतर लगेचच रायगडमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही भोंदू बाबांच्या आमिषांना बळी पडू नये. अशा प्रकारची शंका आल्यास तात्काळ तक्रार करावी.
या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजात अंधश्रद्धेविरोधात जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

