( मुंबई )
मंत्रालयातील लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. खारघर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी विलास लाड याने तब्बल 6 लाख 37 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि लाच स्विकारताना त्याला अटक केली.
झिरवाळ कार्यालयानंतर पुन्हा धक्का
या आधी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लार्क राजेंद्र ढेरंगे याला 12 फेब्रुवारी रोजी लाच घेताना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतरही मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबलेला नसल्याचे या नव्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
ACBने ठरल्याप्रमाणे खारघरमध्ये सापळा रचला होता. आरोपी लाच स्विकारण्यासाठी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून त्याच्या मालमत्तेचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. उच्च सुरक्षा आणि जबाबदारीचे ठिकाण असलेल्या मंत्रालयातच अधिकारी लाच घेताना सापडत असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “पारदर्शकता फक्त कागदावरच आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ACBचा ‘क्लीनअप ड्राइव्ह’ सुरूच
मार्च महिन्यात ACBने मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या होत्या. “मार्च एंडिंग”मुळे ही मोहीम सुरू असल्याची चर्चा होती. मात्र एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या या कारवाईमुळे मंत्रालयातील भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी ACBने आपला मोर्चा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सलग कारवायांमुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर दबाव वाढला असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

