(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खताची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनमधून अचानक धूर निघाल्याने हातखंबा-पाली मार्गावर काही काळ खळबळ उडाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. ही घटना ७ जुलै रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरील माहितीनुसार, एमएच ०८ एच १७५० क्रमांकाचा खताने भरलेला ट्रक पालीच्या दिशेने जात होता. चरवेली टॉवर परिसरातील उतारावरून जात असताना ट्रकच्या केबिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने ट्रक रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभा केला आणि वाहन मालकाला संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. धूर वाढत असल्याचे लक्षात येताच कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी एमआयडीसी येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशामक बंबही मदतीसाठी पोहोचला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ ट्रकच्या केबिनवर पाण्याचा मारा करत धूर आटोक्यात आणला. प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटमुळे केबिनमध्ये धूर निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संभाव्य आग लागण्याचा धोका वेळेत टळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक मदत केंद्राचे पोलीस गायकवाड आणि योगेश दोरखंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासह परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. चालकाच्या सतर्कतेमुळे, अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आणि पोलिसांच्या वेळीच केलेल्या समन्वयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने वाहनचालकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

