(लांजा / प्रतिनिधी)
तालुक्यातील बेरवली डाफलेवाडी येथे कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सत्यवती सखाराम पवार या वृद्ध महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणी लांजा पोलीस ठाणे येथे येथे आरोपी सून स्वाती भिकाजी पवार हिच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यवती पवार आणि आरोपी स्वाती पवार या सासू–सून नात्याने एकाच घरात विभक्त वास्तव्यास आहेत. गुरुवारी (३ एप्रिल) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास स्वाती पवार आणि तिच्या पतीमध्ये घरगुती कारणावरून तीव्र वाद सुरू झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी आणि दोघांना समजावण्यासाठी सत्यवती पवार या शेजारी राहणारे बाळकृष्ण पवार यांच्यासह तेथे गेल्या. मात्र, समजावणीसाठी आलेल्या सासूविषयीचा राग अनावर झाल्याने स्वाती पवार हिने त्यांच्याशी शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर संतापाच्या भरात घरातील कोयता उचलून सत्यवती पवार यांच्यावर वार केला. हा वार त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस तसेच उजव्या हाताच्या मनगटावर बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
या घटनेनंतर जखमी अवस्थेत सत्यवती पवार यांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून स्वाती पवार हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृद्ध सासूवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक तणावाचे हिंसक रूप समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

