(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगबुडी नदी पुलावर शनिवारी दुपारी सुमारे १.१३ वाजता केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला. महाड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून निघालेला हा टँकर बेंगळुरूकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरील सुरक्षा भिंतीवर आदळून थेट कठड्यावर कलंडला.
अपघातानंतर टँकरमधील इथेनॉलयुक्त धोकादायक रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. हे रसायन थेट जगबुडी नदीपात्रात सांडल्याने नदीचे पाणी दूषित झाले झाल्याने खेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, याच नदीतून जॅकवेलद्वारे खेड शहरासह भरणे आणि खाडीपट्टा विभागातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.
या अपघातात टँकर चालक विक्रम सिंग देवानंद पटेल (वय ३४, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाणिज धाम येथील विनामूल्य रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमीला हलवले. चालक सुरज हंबीर यांनी प्रसंगावधान राखत महत्त्वाची मदत केली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधील रसायन स्फोटक स्वरूपाचे असल्याने खबरदारी म्हणून काही काळ वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली होती. दोन अवजड क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. तसेच लोटे एमआयडीसीतील तज्ञांची टीमही घटनास्थळी दाखल झाली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा भोस्त घाटात अपघात झाला होता. अल्पावधीतच पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंपनी व प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

