(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
आंबा घाट परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रकरणाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यातील सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर यादव हा आपल्या मित्र आशिष शांताराम भावके (रा. कराड) याच्यासमवेत चारचाकी वाहनाने Ratnagiri येथे फिरण्यासाठी आला होता. शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले होते. याच दरम्यान आंबा घाट परिसरात सुधीर काही कारणास्तव वाहनातून खाली उतरल्याचे सांगितले जाते. काही वेळ उलटूनही तो परत न आल्याने मित्राने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, महामार्ग सुरक्षा पथकाला घाटातील रस्त्याच्या कडेला सुधीर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला उपचारासाठी साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद रात्री उशिरा अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, तो जखमी कसा झाला, अपघात घडला की अन्य काही प्रकार झाला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सोबत असलेला तरुण सुरक्षित असताना सुधीर एकटाच गंभीर जखमी अवस्थेत कसा सापडला, हा तपासातील महत्त्वाचा प्रश्न मानला जात आहे. घटनेमुळे परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिसांकडून घटनास्थळ, प्रवासाचा कालक्रम, तसेच संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. या प्रकरणाचा उलगडा आता शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

