(लांजा)
तालुक्यातील गवाणे मावळतवाडी येथे राहणाऱ्या ८० वर्षीय गंगा सदू घवाळी या वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गंगा आजी या आपल्या घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांच्या मुलींची लग्न झालेली असून मुलगा नोकरीनिमित्त मुंबईत राहत आहे. रविवारी रात्री अथवा सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या घराशेजारील विहिरीत पडल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्यांना न्याहारीसाठी बोलवण्यासाठी घर गाठले असता त्या घरात दिसून आल्या नाहीत. त्यानंतर आजूबाजूला शोध घेतला असता घराशेजारी असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.