(लांजा)
लांजा तालुक्यातील आगरवाडी येथील युवक साहिल सुरेश सरफरे याची भारतीय वायुसेनेत मेडिकल असिस्टंट या पदावर निवड झाली असून, संपूर्ण देशातून मिळालेल्या १५व्या क्रमांकाच्या यशामुळे त्याने आपल्या गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी रविवारी लांजा शहरातून ते आगरवाडीपर्यंत भव्य गौरव मिरवणूक काढण्यात आली.
सिनिअर कॉलेज परिसरातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीत आगरवाडी व परिसरातील नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग होता. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, डीजेच्या तालावर युवकांचा जल्लोष आणि “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. गावातील महिलांनी औक्षण करून साहिलचे स्वागत केले, तर ग्रामस्थांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंद दाटून आल्याचे चित्र दिसून येत होते. मिरवणुकीचा समारोप आगरवाडी येथे झाला. यावेळी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर गजानन साळवी व एअरफोर्स ऑफिसर व्यंकटेश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी साहिलच्या यशाचे कौतुक करत तरुणांना देशसेवेत पुढे येण्याचे आवाहन केले.
गोपाळकृष्ण संघाचे पदाधिकारी, खेळाडू तसेच आगरवाडी ग्रामस्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध पार पडली. प्रत्येक क्षणाने नागरिकांच्या मनात देशभक्तीची नवी ज्योत प्रज्वलित झाली. आगरवाडीतील पहिल्या वीर जवानाच्या स्वागताचा हा ऐतिहासिक सोहळा ठरला असून, साहिल सरफरेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

