(रत्नागिरी / चिपळूण)
कशेडी परिसरातील भूस्खलनाची नेमकी कारणे शोधून त्याचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. कशेडी घाटात थेट रस्त्यावर दरड कोसळलेली नसून, रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावरील डोंगराचा भाग सरकून खाली आला आहे. या घटनेमागील कारणांचा सर्वंकष तपास करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. परशुराम घाट तसेच चिपळूण परिसरातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
डॉ. सामंत म्हणाले, “घाटातील परिस्थिती तांत्रिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. या भागात वापरण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानाचाही आढावा घेतला आहे. या उपाययोजनांचा अभ्यास करून भविष्यातील नियोजन अधिक सक्षम करण्यात येईल.”
चिपळूणची पूरस्थिती नियंत्रणात
चिपळूणमधील पूरस्थितीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, प्रांताधिकारी आणि संबंधित विभागांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. पूर्वी मुसळधार पावसानंतर शहरात वेगाने पाणी साचून मोठा धोका निर्माण होत असे. मात्र, विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजनामुळे यंदा ती परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आहे.
“चिपळूणकरांचे जीवन अधिक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. तरीही नागरिकांनी कोणताही निष्काळजीपणा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे आवाहनही डॉ. उदय सामंत यांनी केले.

