(जाकादेवी / वार्ताहर)
मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत ३३ केव्ही चाफे वाहिनीवरील बिघाड दूर केला. त्यामुळे निवळी, जाकादेवी, मालगुंड आणि खंडाळा परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा पहाटे साडेतीन वाजेपर्यंत यशस्वीरित्या पूर्ववत करण्यात आला. या कामगिरीबद्दल नागरिकांनी महावितरणच्या पथकाचे कौतुक केले आहे.
सोमवारी (दि. ६) रात्री सुमारे ८.३० वाजता ईएचव्ही (EHV) निवळी उपकेंद्रातून जाणाऱ्या ३३ केव्ही चाफे वाहिनीचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि अंधारामुळे दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक ठरले. तरवळ आयसोलेटर ते चाफे दरम्यान सलग दोन डिस्क फॉल्ट (Faulty Disc) आढळल्याने पथकास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
जाकादेवी, मालगुंड आणि खंडाळा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत समन्वयाने शोधमोहीम सुरू केली. पहिला डिस्क फॉल्ट दुरुस्त केल्यानंतरही वीजपुरवठा सुरू झाला नाही. मात्र हार न मानता पथकाने दुसऱ्या फॉल्टचाही शोध घेत तो दूर केला आणि अखेर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात यश मिळवले.
या कामगिरीचे कौतुक करत जाकादेवी शाखेचे अभियंता राजेंद्र पवार, मालगुंड शाखेचे अभियंता राहुल देशमुख आणि खंडाळा शाखेचे अभियंता साईराज नागवेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि उत्कृष्ट सांघिक कार्याची प्रशंसा केली.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेल्या तत्परतेमुळे ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत झाला असून, त्यांच्या या कार्याचे रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

