( विशेष /प्रतिनिधी )
जीव वाचविण्यासाठी धावणारी 108 रुग्णवाहिका आता स्वतःच जीवघेणी ठरत आहे, असे चित्र जिल्ह्यात उभे राहिले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण आणणाऱ्या एका 108 रुग्णवाहिकेचा दरवाजाचा लॉक तुटल्याने चक्क दोरीने बांधून प्रवास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दरवाजा दोरीने बांधून रुग्णांना रुग्णालयात आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर बोट ठेवणारा ठरला आहे.
जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवेमधून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. आतील ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री कार्यरत नसल्याच्या तक्रारी ही काही वेळेस समोर येत असतात. बुधवारी (१५ ऑक्टोबर) अशाच एका रुग्णवाहिकेत रुग्णाला घेऊन चालक जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाला बाहेर काढण्यासाठी त्याने दोरीने बांधलेला दरवाजा उघडला आणि पुन्हा त्याच दोरीने गाठ बांधून दरवाजा बंद केला. ही संपूर्ण ‘तारेवरची कसरत’ पाहून तेथील नागरिक एकटक पाहतच राहिले. रुग्णाच्या जीवावर उठलेली अशी प्रवासयात्रा पाहून “ही जीवदायिनी की जीवघेणी सेवा?” असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
खड्डेमय रस्त्यांवरून या रुग्णवाहिका धावत असताना वाहनांचे आणि रुग्णांचे दोघांचेही हाल होतात. परंतु तरीही वाहनांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती का केली जात नाही, हा संतप्त सवाल सध्या उपस्थित होत आहे. देखभाल आणि सेवा जबाबदारी असणाऱ्या व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळेच अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचीही चर्चा सुरू आहे. जिल्ह्याभरात अनेक 108 रुग्णवाहिकांची तांत्रिक स्थिती अत्यंत बिकट होत आहे. रुग्णवाहिकांच्या पत्र्यांना गंज, दरवाजे तुटलेले, काही भाग दोरीने बांधलेले, ऑक्सिजन सिलिंडर नादुरुस्त, एसी बंद किंवा निकामी, अशा स्थितीत धावत असलेल्या रुग्णवाहिका ‘आपत्कालीन सेवा’ म्हणून ओळखली जाण्याऐवजी ‘जोखीम वाहन’ म्हणून ओळख मिळवू लागल्या आहेत.

अशा रुग्णवाहिकांमधून रुग्णाला सुरक्षित आणि वेळेत रुग्णालयात पोहोचवणे हे चालक आणि डॉक्टर या दोघांसाठीही मोठे आव्हान बनले आहे. ही अवस्था केवळ वाहनांची झीज नाही, तर आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनाहीनतेचे जिवंत उदाहरण आहे. वेळोवेळी दुरुस्ती, तांत्रिक तपासणी आणि उपकरणांची चाचणी याकडे संबंधित व्यवस्थापक आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. परिणामी, रुग्णवाहिका ही जीवनदायिनी न राहता ‘धोकादायिनी’ ठरत आहे. प्रशासनाने तातडीने या रुग्णवाहिकांची तांत्रिक तपासणी करून दोषपूर्ण वाहनांची सेवा तत्काळ थांबवावी, अन्यथा पुढील एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
या गंभीर प्रकरणाकडे पालकमंत्र्यांनी आणि आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, दोरीने बांधलेली ही रुग्णवाहिका सेवा लवकरच जनतेचा विश्वास गमावेल. त्यामुळे या सर्व गंभीर प्रकाराबाबत प्रशासन कोणती ठोस भूमिका हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज
108 रुग्णवाहिकेत असलेला डॉक्टर उपचारासाठी रुग्णाजवळ राहणे अपेक्षित असताना, अनेक वेळा डॉक्टर पुढील सीटवर बसून प्रवास करताना दिसतात. मागील बाजूस रुग्ण विवळत असतानाही दुर्लक्ष केल्याचे प्रकार ही काहीवेळेस ऐकायला मिळतात. अशा गंभीर गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. 108 रुग्णवाहिका सेवा रुग्णांना जगवण्यासाठी आहे की त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी? असा सणसणीत सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

