(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जून महिन्याचा मध्य जवळ आला तरी मान्सूनच्या संततधारा जिल्ह्यावर बरसलेल्या नसल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत चालले आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून सध्या ६४ गावांतील तब्बल १५१ वाड्यांमधील ४५ हजार ८८३ ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या भागांमध्ये केवळ १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी तो अपुरा ठरत असल्याने अनेक ग्रामस्थांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, कोकणातील मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातही दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ अनेक गावांवर आली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील ६१ गावांतील १४५ वाड्यांमधील ४४ हजार ७०२ नागरिक टंचाईग्रस्त होते. मात्र, पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली असून टंचाईग्रस्त गावांबरोबरच प्रभावित लोकसंख्येतही वाढ झाली आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा पारा वाढला असून विहिरी, झरे आणि इतर स्थानिक जलस्रोत झपाट्याने आटू लागले आहेत. परिणामी, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ वाढली आहे. आगामी काही दिवसांतही समाधानकारक पाऊस न झाल्यास टंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट गंभीर स्वरूप धारण करत आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यांतील अनेक गावे टंचाईच्या विळख्यात सापडली आहेत. मात्र, लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये अद्याप परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१८ टँकरवर हजारो नागरिकांची भिस्त
टंचाईग्रस्त भागांतील ४५ हजार ८८३ नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन शासकीय आणि १५ खासगी अशा एकूण १८ टँकरची नियुक्ती करण्यात आली आहे. या टँकरनी आतापर्यंत २ हजार ६५३ फेऱ्या मारून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वाढत्या मागणीच्या तुलनेत हा पुरवठा अपुरा ठरत असल्याने अनेक गावांमध्ये पाण्यासाठी प्रतीक्षा आणि धावपळ कायम आहे.
गतवर्षी मान्सूनचा दिलासा, यंदा प्रतीक्षा कायम
गतवर्षी २० मेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. १ ते १२ जून या कालावधीत तब्बल ८३८.५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले नव्हते. याउलट यंदा त्याच कालावधीत केवळ ५९५.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने जलसाठ्यांवर परिणाम झाला असून त्याचीच झळ आता हजारो ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे. मान्सूनच्या जोरदार पुनरागमनाची प्रतीक्षा संपूर्ण जिल्हा करत असताना, प्रत्येक दिवसागणिक वाढणारी पाणीटंचाई प्रशासनासमोरही मोठे आव्हान बनली आहे.

