(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील अर्जुना धरण परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज निरीक्षक गृहाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विभागीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अर्जुना धरण हा तालुक्यातील महत्त्वाचा पाटबंधारे प्रकल्प मानला जातो. येथे कार्यरत अधिकाऱ्यांसाठी तसेच येणाऱ्या पाहुण्यांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधांनी युक्त निरीक्षक गृहाची आवश्यकता दीर्घकाळ जाणवत होती. ही गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाने अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत उभारली आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार किरण सामंत यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “अर्जुना धरण हा परिसराच्या विकासाचा मुख्य आधार आहे. येथे उपलब्ध सुविधांमध्ये वाढ केल्यास प्रशासनाचे काम अधिक प्रभावी होईल.” तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अधिकाऱ्यांनी निरीक्षक गृहाच्या बांधकामाची माहिती देत त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आढावा सादर केला. नव्या इमारतीमुळे धरण परिसरातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असून, संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उद्घाटनामुळे अर्जुना धरण परिसराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.
कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, तहसीलदार विकास गंबरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जी. प. सदस्या सौ. सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या सौ. अपेक्षा मासये, माजी जी. प. सदस्य आबा आडीवरेकर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, उपविभागीय अभियंता अमोल बनसोडे, मंडळ अधिकारी पूनम गावीत, करक सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरी सरपंच अमर जाधव, पाचल सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, विभाग प्रमुख शैलेश साळवी, माजी सरपंच सुनील जाधव यांच्यासह प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.

