(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील समुद्र किनारपट्टीवर पर्ससीन बोटीधारक आणि पारंपरिक लहान बोटींनी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला असून साखरी-नाटे आणि परिसरात या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही गटांमध्ये झालेल्या धुमश्चरक्री, बाचाबाची आणि शिवीगाळीचे काही व्हिडिओही समोर आले असल्याचे सांगितले जात आहे.
पारंपरिक पद्धतीने जाळे टाकून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा आरोप आहे की, पर्ससीन नेटद्वारे मोठ्या प्रमाणावर मासेमारी करणारे काही व्यावसायिक आर्थिक आणि राजकीय ताकदीच्या जोरावर गरीब पारंपरिक मच्छीमारांवर दबाव टाकत आहेत. त्यांच्या मते, मोठ्या बोटींमुळे समुद्रातील मासेमारीचा समतोल बिघडत असून पारंपरिक मच्छीमारांचा अक्षरशः उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी समुद्रात पारंपरिक मच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यांवरूनच मोठ्या बोटीने जाऊन नुकसान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी, शिवीगाळ आणि आक्रोश झाल्याचे व्हिडिओमधून दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शासनाच्या नियमांनुसार पर्ससीन बोटींनी किनारपट्टीच्या अगदी जवळ मासेमारी करू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही अनेक वेळा मोठ्या बोटींमार्फत किनाऱ्यालगत मासेमारी केली जात असल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांकडून केला जात आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे जाळे, साधने आणि मासेमारीचा हक्क धोक्यात येत असल्याचे ते सांगत आहेत.
या संदर्भात संबंधित विभागांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आणि दबावामुळे या तक्रारींकडे संबंधित अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही पारंपरिक मच्छीमारांकडून केला जात आहे.
यामुळे संतप्त झालेल्या अनेक पारंपरिक मच्छीमारांनी आता थेट राज्याचे बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे यांच्याकडे दाद मागण्याचा विचार केला आहे. गरीब पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळणार का, त्यांच्यासाठी कोणी वाली आहे की नाही, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्ट प्रवृत्तीमुळे पर्ससीन नेटधारकांचे मनोबल वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत असूनही कारवाई होत नसल्याने पारंपरिक मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांचे कठोर पालन करावे, अन्यथा समुद्रात संघर्षाच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

