(राजापूर)
शहर बाजारपेठ तसेच ओणी बाजारपेठ परिसरात रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर राजापूर पोलिसांनी कारवाईची जोरदार मोहीम राबविली आहे. बुधवारी अवघ्या एका दिवसात अशा तब्बल १६ वाहनचालकांवर सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
राजापूर बाजारपेठेतील रस्ते अरुंद असून, दोन्ही बाजूंना अनधिकृत व अवैध पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. नागरिक, व्यापारी आणि सार्वजनिक वाहतूक यांना त्यामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. वारंवार सूचना देऊनही बेशिस्त पार्किंग कायम राहिल्याने अखेर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला.
बुधवारी राजापूर बाजारपेठ, ओणी बाजारपेठ तसेच सौंदळकडे जाणाऱ्या मार्गावर बेकायदेशीररित्या उभी करण्यात आलेली वाहने तपासण्यात आली. या कारवाईत १६ वाहनचालकांकडून सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याचे आढळल्याने भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
या कारवाईनंतर शहरातील बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून वाहतूक शिस्त पाळण्यासाठी अशी नियमित कारवाई आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

