(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय राजापूर तालुक्यातील एका डॉक्टरला आला आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत नग्न फोटो मिळवून त्याआधारे ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या लांज्यातील एका तरुणाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडदहसोळ येथे उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय गिरीधर म्हादये (वय ३१, रा. वडदहसोळ, ता. राजापूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून, सन २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांची ‘नेहा बिराडी’ (आयडी : neha_biradi_03) नावाच्या कथित महिलेशी ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवाद साधत समोरच्या व्यक्तीने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चॅटिंगदरम्यान डॉक्टरांकडून नग्न अवस्थेतील फोटो मिळवण्यात आले. काही दिवसांनी सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, ता. लांजा) याने हेच फोटो हत्यार बनवत डॉक्टरांना व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने फिर्यादींकडे २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. समाजात अब्रू जाण्याच्या भीतीने घाबरलेल्या डॉक्टरांनी आरोपीच्या खात्यावर ‘गुगल पे’द्वारे २५ हजार रुपये वर्ग केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, आरोपीची पैशांसाठीची मागणी वाढतच गेल्याने अखेर डॉक्टरांनी धाडस करत राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा संबंधित आरोपीविरोधात खंडणी आणि ऑनलाईन धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर माध्यमातून वाढणाऱ्या अशा ‘हनी ट्रॅप’ प्रकारांमुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

