(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित ‘रेडस् ॲप’ने गुन्हे तपासातील आपली उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या ॲपच्या साहाय्याने नागपूर येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिस तपासातील अचूकता आणि वेग वाढविणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे राज्यातील तपास यंत्रणेला नवे बळ मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरीचे नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे ॲप आता राज्यातील विविध पोलिस यंत्रणांसाठी प्रभावी साधन ठरत आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील वाडी पोलीस स्थानक हद्दीतील जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप असल्याने ओळख पटविणे हे स्थानिक पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. अनेक स्तरांवर प्रयत्न करूनही मृत व्यक्तीची ओळख निश्चित होत नसल्याने नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ‘रेडस्प अँप’च्या साहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून विद्रूप झालेल्या चेहऱ्यावरून मूळ चेहरा कसा असू शकतो, याचा अचूक अंदाज या प्रणालीने मांडला. या प्रक्रियेनंतर तयार झालेल्या छायाचित्राच्या आधारे अवघ्या दोन तासांत संबंधित व्यक्तीची ओळख पटली. मृत व्यक्ती नागपूर येथील दौलामेटी, आठवा मैल परिसरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस तपास अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक व्हावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील इतर भागांतील गुन्हे उघडकीस आणण्यास आणि अज्ञात व्यक्तींची ओळख पटविण्यासही मोठी मदत होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पोलिस तपास व्यवस्थेला भविष्यात अधिक सक्षम बनवेल, असा विश्वास पोलिस यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

