(रत्नागिरी / प्रतिनिधी)
किनारपट्टी सुरक्षेला अधिक सक्षम आणि गतिमान बनविण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक स्पीड बोटीचा समावेश करण्यात आला आहे. या स्पीड बोटीचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही स्पीड बोट पोलीस दलाच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. वाढत्या सागरी सुरक्षेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही बोट पोलीस यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेषतः किनारपट्टी भागातील संशयास्पद हालचालींवर प्रभावी नजर ठेवणे, आपत्कालीन मदतकार्य अधिक वेगाने राबविणे तसेच सागरी गस्त अधिक सक्षमपणे पार पाडणे यासाठी या स्पीड बोटीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास रत्नागिरी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

