( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी आता बौद्ध समाजाने कंबर कसली आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हील हॉस्पिटल शेजारी) येथे महामोर्चाची पूर्वतयारी म्हणून महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सन १९५६ नंतर समाजाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर या जागेचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन विविध धार्मिक संघटनांकडून वेळोवेळी मागणी होत आली. महाराष्ट्र शासन व रत्नागिरी प्रशासनाकडून महसूल विभागाने १७.५० गुंठे क्षेत्र बुद्ध विहारासाठी राखीव असल्याची नोंदही केली होती. या परिसरात बौद्ध पूजापाठ, जयंती महोत्सव आदींचा सातत्याने साजरा होणारा वारसा आजही सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत रत्नागिरी नगर परिषदेने या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याचे कामकाज हाती घेतल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. परिसरात उभारण्यात येणारे सेंटर रद्द करून जागा पुन्हा थिबा राजा कालीन बुद्ध विहारासाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्याची मागणी संघर्ष समितीकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सभेस सर्व समाजबंधूंनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत व्ही. सावंत , सचिव अमोल जाधव या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

