(लांजा)
लांजा शहरातील आगरवाडी परिसरात घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात वनिता वसंत पांचाळ (वय ६७) यांचा जागीच मृत्यू झाला. माळ्यावर ठेवलेला जांभा दगड अचानक खाली कोसळून त्यांच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पांचाळ कुटुंबाच्या घराचे दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. माळ्यावरील भागातील जांभा दगड काढून ते तात्पुरते माळ्यावरच ठेवण्यात आले होते. शुक्रवारी कामगार गैरहजर असल्याने काम बंद होते. दुपारच्या सुमारास वनिता पांचाळ या वाडीतील कार्यक्रम आटोपून घरी परतल्या आणि घरात विश्रांतीसाठी झोपल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास माळ्यावर ठेवलेल्या दगडांचा भार लाकडी खांबावर आल्याने तो अचानक तुटला आणि त्यावरील एक जड दगड खाली कोसळला. हा दगड वनिता पांचाळ यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस आदळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातून मोठा आवाज आल्याने शेजारी तातडीने मदतीसाठी धावले. मात्र पडलेला दगड मुख्य दरवाजासमोर अडथळा ठरल्याने दरवाजा उघडता येत नव्हता. अखेर एका व्यक्तीने भिंतीवरून माळ्यावर प्रवेश करून आत उतरून दरवाजासमोरील दगड हटविला.
त्यानंतर घरात प्रवेश करून वनिता यांच्या अंगावरील फळ्या बाजूला करण्यात आल्या आणि त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोद सरंगले तसेच हेडकॉन्स्टेबल नासीर नावळेकर यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

