(रत्नागिरी / वार्ताहर )
मराठी ही अभिजात भाषा असून तिच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध विषयांतील परिभाषा कोश निर्मितीचे कार्य महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सुरू आहे. कृषी शास्त्रातील परिभाषा कोश अधिक समृद्ध व सुधारित करण्यासाठी कृषी शास्त्र परिभाषा कोश उपसमितीची ९१ वी सभा रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी आधारित असून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील महिला आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करतात. कृषी क्षेत्रात सातत्याने नवीन संशोधन, तंत्रज्ञान आणि संकल्पना विकसित होत असतात. हे ज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत आणि बोलीभाषेत पोहोचणे आवश्यक असल्याने कृषी विषयातील परिभाषा कोशाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
सध्या अनेक संशोधनपर संकल्पना इंग्रजी भाषेत उपलब्ध असतात. त्या मराठीतून प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांना त्यांचे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी मराठीतील अचूक व समर्पक संज्ञा निर्माण करण्याचे काम या समितीमार्फत केले जात आहे.
कृषी शास्त्र परिभाषा कोश उपसमितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव उल्मेक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे कामकाज सुरू असून मराठी भाषा संचालनालयाचे भाषा संचालक श्री. अरुण गीते, उपसंचालक तसेच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत.
यावेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. भीमराव उल्मेक आणि भाषा संचालक श्री. अरुण गीते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बैठकीस कृषी शास्त्र परिभाषा कोश समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित असून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका सौ. स्नेहा शिवलकर यांना विशेष आमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे.

