(पुणे)
राज्यातील शाळांमध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या दिवशी विशेष पथके शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद प्रणालीमध्ये करतील.
ही प्रक्रिया सुरळीत आणि एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही याच दिवशी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) आयोजित करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. याच दिवशी संबंधित वर्गांची पटपडताळणी प्रक्रिया देखील राबवण्यात येणार आहे.
परिपत्रकानुसार, इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा तसेच इयत्ता अकरावीची मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांची परीक्षा याच तारखांना आयोजित केली जाईल.
पटपडताळणीसाठी ‘स्टुडंट पोर्टल’वर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र लॉगिन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाळांना भेट देणारे पथक या प्रणालीद्वारे उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद करणार आहे.
दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पटपडताळणी केली जाणार नाही. राज्य मंडळाच्या परीक्षेतील उपस्थितीच ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

