( मुंबई )
अंधेरी पूर्व परिसरात नाल्यात सापडलेल्या कुजलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणाने रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आली असून, 80 वर्षीय महिलेची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या भावासह वहिनीला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव जेमे सिक्यूअरा असे असून, या प्रकरणात तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोहेलो आणि त्याची पत्नी मारिया कोहेलो यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाल्यात सापडला कुजलेला मृतदेह
काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील नाल्यात साफसफाई सुरू असताना कामगारांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. मृतदेह इतका कुजलेला होता की ओळख पटवणे अवघड झाले होते. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि तपास सुरू केला.
मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मागील काही महिन्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी केली. मृतदेहावरील कपड्यांच्या आधारे जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या एका तक्रारीशी साधर्म्य आढळले. त्यानुसार मृत महिला जेमे सिक्यूअरा असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार स्वतः तिच्या भावानेच नोंदवली होती.
अंधेरीतील मरोळ परिसरात आरोपी जोसेफ थॉमस कोहेलो आपल्या वृद्ध बहिणीसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात जोसेफने बहिणीला जोरात ढकलल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. बहिणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी घाबरला. त्याने पत्नी मारिया कोहेलो हिच्या मदतीने मृतदेह लपवण्याचा कट रचला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकला.
संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा सापळा
तपासादरम्यान पोलिस जेव्हा महिलेच्या घरी चौकशीसाठी गेले, तेव्हा आरोपी दाम्पत्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी चौकशीचा कडाका वाढवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. सध्या अंधेरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण काय होते याचा अधिक तपास सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

