( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यातील वादात सापडलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजने लोटे-परशुराम औद्योगिक परिसरातील आपल्या प्रकल्पाविषयी सुरू असलेल्या प्रश्न, चर्चांदरम्यान प्रथमच सविस्तर भूमिका मांडत पर्यावरणीय सुरक्षितता, वैधानिक परवानग्या आणि उत्पादन प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिले. शुक्रवारी आयोजित विशेष पत्रकार परिषदेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प सर्व लागू नियम, परवानग्या आणि सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करूनच चालविला जात असल्याचा दावा केला आहे.
VIDEO PC| PFAS उत्पादनासाठी कोकणची निवड का? लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी अधिकाऱ्यांना पत्रकारांचे थेट सवाल
कंपनीचे उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष Deepak Patil यांनी सांगितले की, लोटे येथील प्रकल्प स्थापनेपासूनच सर्व आवश्यक शासकीय मंजुरी मिळवून कार्यरत आहे. उत्पादन प्रक्रियेत अत्याधुनिक ‘क्लोज्ड-लूप’ प्रणाली वापरली जात असून, त्यामुळे कोणतेही घातक घटक बाह्य पर्यावरणात जाण्याची शक्यता टाळली जाते. प्रकल्पातून निर्माण होणारे फ्ल्युरिनयुक्त सांडपाणी स्वतंत्र पद्धतीने संकलित करून राज्य शासनमान्य घातक कचरा प्रक्रिया केंद्रांकडेच विल्हेवाटीसाठी पाठविले जाते. तसेच उच्च क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित असून, कोणतेही प्रक्रिया न केलेले सांडपाणी सार्वजनिक जलस्रोतांमध्ये सोडले जात नसल्याचा दावा करण्यात आला. कंपनीच्या मते, संपूर्ण उत्पादन व कचरा व्यवस्थापन प्रक्रिया डिजिटल ट्रेसेबिलिटी प्रणाली अंतर्गत नियंत्रित केली जाते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखली जाते. फ्लोअरिंगपासून सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सर्व सुविधा उच्च औद्योगिक सुरक्षामानकांनुसार उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत कंपनीने PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या रसायनसमूहाबाबतही सविस्तर माहिती दिली. हे एकच रसायन नसून १० हजारांहून अधिक फ्लोरीनयुक्त संयुगांचा मोठा समूह असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उष्णता, पाणी, तेल, रसायने आणि विजेच्या प्रतिकारक्षमतेमुळे या संयुगांचा वापर सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण क्षेत्र, औषधनिर्मिती आणि कृषी-रसायन उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. कंपनीने नमूद केले की, भारतासह अमेरिका, युरोप, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्येही PFAS संबंधित उत्पादने नियमनबद्ध चौकटीत तयार केली जातात. काही देशांत निर्बंध असले तरी ते मुख्यत्वे अयोग्य सांडपाणी व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय परिणामांच्या पार्श्वभूमीवर लावले गेले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
VIDEO|कंपनीविरोधात आंदोलनकर्त्यांना भेटावं वाटत नाही का? लक्ष्मी ऑरगॅनिकचे अधिकारी म्हणाले…
इटलीतील Miteni S.p.A. प्रकरणाशी तुलना करताना कंपनीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्या प्रकरणात प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडल्याचे आरोप होते; मात्र लोटे प्रकल्पात क्लोज्ड-लूप तंत्रज्ञानामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकत नाही. लोटे येथील उत्पादन पायाभूत सुविधा स्वतंत्रपणे भारतीय नियामक चौकटीत नव्याने उभारण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, प्रकल्पासाठी Maharashtra Pollution Control Board, औद्योगिक सुरक्षा विभाग, MIDC अग्निशमन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच Petroleum and Explosives Safety Organisation यांच्याकडून आवश्यक मंजुरी प्राप्त आहेत. क्लोरीन, निर्जल हायड्रोजन फ्ल्युराईड, पेट्रोलियम पदार्थ साठवण तसेच सॉल्व्हेंट्स वापरासाठी स्वतंत्र परवानेही घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेवेळी कंपनीचे उत्पादन विभागाचे अध्यक्ष राजेश नाईक आणि पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय वैश्यपायन उपस्थित होते. त्यांनी भविष्यातील कोणताही विस्तार केवळ सर्व नियामक मंजुरी मिळाल्यानंतरच केला जाईल, असे स्पष्ट केले. कंपनीच्या या भूमिकेमुळे लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील PFAS प्रकल्पाबाबत उपस्थित होत असलेल्या पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर अधिकृत बाजू समोर आली असली, तरी स्थानिक पातळीवर कंपनी विरोधात सुरू असलेले उपोषण अद्याप सुरूच आहे.
PFAS प्रकल्पाविरोधात ६ एप्रिलला मोर्चा
लोटे-परशुराम येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजमध्ये सुरू असलेल्या PFAS उत्पादनाविरोधात दि. ६ एप्रिल रोजी कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कोकण नागरी संघर्ष समिती लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण, पाणी, माती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत PFAS उत्पादन तात्काळ बंद करावे, प्रदूषणाची चौकशी करून वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा, तसेच जनसुनावणी घेऊन स्थानिकांचे मत विचारात घ्यावे, अशा मागण्या मोर्चातून करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

