(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्या समोर अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा संगमेश्वर पंचायत समितीत लिपिक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९:३० ते १०:०० दरम्यान घडली. पीडित विद्यार्थिनी देवरुख येथील संगणक वर्ग आटोपून एस.टी. बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांचा पाठलाग सुरू केला.
मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपीने दुचाकी थांबवून विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन, चालत्या दुचाकीवर उभे राहून अश्लील कृत्य केल्याने विद्यार्थिनी घाबरून आरडाओरडा करू लागल्या. मात्र, आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
भयभीत विद्यार्थिनींनी घरी पोहोचताच पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. पालकांनी त्यांना धीर देत २ एप्रिल रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८, ७९ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी सरकारी कर्मचारी असल्यामुळे या घटनेची परिसरात तीव्र चर्चा सुरू असून, महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

