(रत्नागिरी /संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंप समोर एका खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून वाहन पूर्णतः जळून खाक झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) हे त्यांच्या ताब्यातील NL 01B 2442 क्रमांकाची प्रवासी ट्रॅव्हल्स घेऊन पुण्याहून सुमारे ३० प्रवाशांसह रत्नागिरीकडे निघाले होते. गुरुवारी सायंकाळी सुटलेले हे वाहन शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास साखरपा येथील जाधववाडी परिसरात पोहोचले असता चालकाच्या निदर्शनास वाहनातून धूर निघत असल्याचे आले. काही क्षणांतच वाहनाने पेट घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली.
धोक्याची जाणीव होताच चालकाने विलंब न करता तत्काळ सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविले. त्यामुळे वाहन काही मिनिटांत आगीच्या विळख्यात सापडले असले तरी सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत वाहन पूर्णतः भस्मसात झाले होते. या आगीत ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर तसेच चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवून प्रवाशांना आवश्यक मदत केली. या प्रसंगात चालकाच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

