(रत्नागिरी)
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे दि. १ एप्रिल २०२६ रोजी ‘सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन’ या विषयावर श्री. इम्रान शेख यांचे व्याख्यान उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम तंत्रनिकेतनच्या परिषद दालनात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी प्रमुख पाहुणे श्री. इम्रान शेख यांची उपस्थितांना ओळख करून दिली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्री. शेख हे या तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी असून सध्या ते अबूधाबी येथील राष्ट्रीय मत्स्यालयात सागरी जीवशास्त्रज्ञ व मत्स्यालय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या मार्गदर्शनात श्री. शेख यांनी सागरी मत्स्यालय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर सविस्तर प्रकाश टाकला. पाण्याची गुणवत्ता, आवश्यक उपकरणे, मासे व जलवनस्पतींची काळजी, अन्न व्यवस्थापन, रोग नियंत्रण, योग्य प्रकाश व्यवस्था आणि फिल्ट्रेशन प्रणाली याविषयी त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली. तसेच मत्स्यालयाची नियमित देखभाल ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक स्तरावर सागरी मत्स्यालयांची वाढती निर्मिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या क्षेत्रात योग्य तयारी केल्यास यशस्वी करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. व्याख्यानानंतर आयोजित चर्चासत्रात उपस्थितांनी सागरी मत्स्यालय व्यवस्थापनाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथील अधिकारी व संशोधक, तसेच तंत्रनिकेतनचे प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

