(चिपळूण- रत्नागिरी/ प्रतिनिधी)
पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा १४ एप्रिल २०२६ पासून चिपळूणमधील पत्रकार बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील, असा ठाम इशारा पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
२५ मार्च रोजी शहरातील बहादूरशेख नाका परिसरात वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भरदिवसा नियोजनपूर्वक हल्ला केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेची चित्रफीत उपलब्ध असून त्यामधून हल्लेखोर स्पष्टपणे ओळखू येत असतानाही, घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने पोलीस तपासाच्या गतीवर पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांच्या मते, हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा आक्रमण नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला थेट प्रहार आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरच अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. तपासातील विलंबामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित तत्परता दिसून येत नसल्याची खंतही निवेदनातून नोंदवण्यात आली.
या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी पत्रकारांनी केली आहे. अन्यथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिलपासून चिपळूण येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. संविधान रचणाऱ्या महामानवाच्या जयंतीदिनी न्यायासाठी पत्रकारांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त करत, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली. यावेळी चिपळूणमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
आरोपींच्या अटकेस विलंब का होतोय
भरदिवसा पत्रकारावर जीवघेणा हल्ला होतो, घटनेची चित्रफीत उपलब्ध असते, हल्लेखोर स्पष्ट दिसतात, तरीही आरोपी मोकाट कसे? चिपळूणमध्ये घडलेल्या या घटनेने कायदा-सुव्यवस्थेची प्रतिमा धुळीस मिळालेली नाही का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकही विचारू लागले आहेत. पत्रकार दिपक भागवत यांच्यावर हल्ला होणे म्हणजे केवळ एका व्यक्तीवरचा प्रहार नसून सत्य मांडणाऱ्या माध्यमांच्या आवाजालाच गप्प करण्याचा प्रयत्न नाही का? आरोपींच्या अटकेस विलंब का होत आहे, तपासाची गती नेमकी कुठे अडकली आहे, आणि कायद्याचा धाक गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर उरला आहे की नाही? असे एक नवे अनेक संतप्त सवाल अधिक तीव्रतेने पुढे येत आहेत.

