(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे उघडकीस आलेल्या परकीय महिलेच्या प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास राहिल्याचा आरोप असलेल्या या महिलेने थेट मतदान प्रक्रियेतही सहभाग घेतल्याची चर्चा सध्या स्थानिक पातळीवर जोर धरत आहे. या चर्चेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि निवडणूक व्यवस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी पोलिसांनी संबंधित महिलेसह तिच्या पतीलाही ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान तिच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले वैध पासपोर्ट किंवा व्हिसा आढळून आला नव्हता. तरीही ती गेल्या पाच वर्षांपासून या भागात राहत असल्याचे समोर आले. यामुळे सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट झाल्या होत्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेने बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून घेतले होते. याच कागदपत्रांच्या आधारे तिने एका बँकेत खाते उघडून आर्थिक व्यवहारही सुरू केले होते. त्यामुळे केवळ प्रशासनच नव्हे, तर बँकिंग व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, या महिलेचे नाव मतदार यादीतही समाविष्ट झाले होते. इतकेच नव्हे, तर तिने मागील निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष मतदान केल्याचाही दावा केला जात आहे. ही बाब खरी ठरल्यास, तो केवळ सुरक्षेचा भंग नसून लोकशाही प्रक्रियेवर गंभीर आघात ठरेल.
परकीय नागरिक, ज्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत, ती मतदार यादीत नाव नोंदवण्यापर्यंत कशी पोहोचली? पडताळणी प्रक्रियेत नेमकी कुठे चूक झाली? अशा प्रश्नांनी स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेला नेमके कोणाचे पाठबळ होते, याचा तपास करणे आता अत्यावश्यक ठरत आहे. पोलिस आणि निवडणूक विभागाकडून या कथित मतदानाची अधिकृत पडताळणी होणार का, आणि दोषींवर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

