(संगमेश्वर / एजाज पटेल)
मास्टर® एज्युकेशन अकादमीच्या वतीने आयोजित ५वी आंतरराज्यीय स्तर अॅबॅकस स्पर्धा २०२६ आणि १५वी आंतरराज्यीय स्तर वैदिक गणित स्पर्धा २०२६ मध्ये संगमेश्वर येथील कु. सिया राहुल कुचेकर हिने घवघवीत यश संपादन करत चॅम्पियन अवॉर्ड पटकावला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, कसबा येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारी सिया सध्या वीरा इन्स्टिट्यूट, संगमेश्वर येथे अॅबॅकसचे प्रशिक्षण घेत आहे. २००६ पासून कार्यरत असलेल्या मास्टर एज्युकेशन अकादमीच्या या प्रतिष्ठित आंतरराज्यीय स्पर्धांमध्ये देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वेग, अचूकता आणि मानसिक गणितातील कौशल्याच्या जोरावर सियाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.
इचलकरंजी येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते सियाला चॅम्पियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या यशामागे वीरा इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक धनंजय भांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करणे, सातत्यपूर्ण सराव घडवणे आणि आत्मविश्वास वाढवणे यासाठी धनंजय भांगे हे विशेष प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सियाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वीरा इन्स्टिट्यूट, पालकवर्ग तसेच शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर सिया भविष्यात आणखी मोठी यशशिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

