(संगमेश्वर /एजाज पटेल)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) रत्नागिरी विभागातील देवरुख आगारात कार्यरत असलेले चालक मिलिंद वसंत शिंदे यांनी दहा वर्षांहून अधिक कालावधीत एकही अपघात न करता सेवा बजावून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी रत्नागिरी विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.
एस.टी. महामंडळाच्या नियमांनुसार प्रवाशांची सुरक्षितता, वेळेचे पालन, वाहनांची काळजीपूर्वक हाताळणी तसेच वाहतूक कायद्यांचे काटेकोर पालन करणे चालकांसाठी बंधनकारक आहे. मिलिंद शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात या सर्व नियमांचे अत्यंत प्रामाणिकपणे पालन करत “सुरक्षित प्रवास हेच सर्वोच्च ध्येय” या महामंडळाच्या धोरणाला प्रत्यक्ष कृतीतून साकारले आहे.
त्यांच्या विनाअपघात सेवेने एस.टी. महामंडळाची जनमानसातील विश्वासार्ह प्रतिमा अधिक भक्कम झाली असून, प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे. मोटार वाहन कायदा, वाहतूक सुरक्षा नियम व एस.टी. महामंडळाच्या अंतर्गत शिस्तनियमांचे पालन करत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली असल्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.
हा सन्मान रत्नागिरी विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मिलिंद शिंदे यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ चालक हे महामंडळाची खरी ताकद असून, त्यांच्या कार्यामुळे इतर चालकांनाही प्रेरणा मिळते.
मिलिंद शिंदे यांची वाहन चालवण्याची पद्धत जितकी प्रवाशांसाठी सुरक्षित व समाधानकारक आहे, तितकाच त्यांचा स्वभावही प्रशंसनीय आहे. संयमी, मितभाषी, आपुलकीने वागणारे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सहकारी व प्रवाशांमध्ये परिचित आहेत. त्यांच्या उत्तम वर्तनामुळे एस.टी. सेवेला मानवी स्पर्श मिळतो, असे अनेक प्रवासी आवर्जून नमूद करतात.
त्यांना सन्मानपत्र मिळाल्याची बातमी समजताच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रत्यक्ष भेटींसह व्हॉट्सअॅप, फेसबुक, फोन कॉल्स व इतर समाजमाध्यमांतून त्यांना शुभेच्छा देण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी सर्वत्र सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
मिलिंद शिंदे यांची ही कामगिरी म्हणजे एस.टी. महामंडळाच्या नियमबद्ध, सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुकीच्या धोरणाचा जिवंत आदर्श असून, नव्या पिढीतील चालकांसाठी ती निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

