( सातारा )
कराड शहरात वाढलेल्या घरफोड्यांच्या घटनांना अखेर आळा बसला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात मोठं यश मिळवलं आहे. बंद घरांची रेकी करून स्वतःच्या कारमधून येत चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे आहे. त्याच्यावर सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घरफोडीचे तब्बल २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकापूर आणि सैदापूर परिसरात एप्रिलच्या सुरुवातीलाच घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या. या भागात शैक्षणिक संकुलं आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने सुट्ट्यांच्या काळात बंद असलेली घरं चोरट्यांच्या निशाण्यावर येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
उपनिरीक्षक निखील मगदूम यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. त्यातून एका संशयित कारचा माग काढण्यात आला. तपासात ही कार लोकेश सुतारच्या नावावर असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी सुतारला ताब्यात घेतलं असता त्याने मलकापूर आणि सैदापूर येथील घरफोड्यांची कबुली दिली.
आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. लोकेश सुतार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

