(मुंबई )
राजा रवी वर्मा यांचे प्रसिद्ध ‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र विक्रमी 167.20 कोटी रुपयांना विकले गेले असून यामुळे भारतीय कला विश्वात आजवरची मोठी नोंद झाली आहे. मुंबईत Saffronart आयोजित ‘स्प्रिंग लाइव्ह ऑक्शन’मध्ये हा ऐतिहासिक व्यवहार पार पडला. हे चित्र डॉ. सायरस एस. पूनावाला यांनी खरेदी केले असून, आधुनिक भारतीय कलेच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीला विकले गेलेले हे पहिलेच चित्र ठरले आहे.
यापूर्वी हा विक्रम एम. एफ. हुसेन यांच्या ‘अनटायटल्ड (ग्राम यात्रा)’ या चित्राच्या नावावर होता, ज्याला सुमारे 119 कोटी रुपयांची किंमत मिळाली होती. मात्र, ‘यशोदा आणि कृष्ण’ने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढत भारतीय कला बाजारात नवा मानदंड निर्माण केला आहे.
1890 च्या दशकात रेखाटलेले हे तैलचित्र रवी वर्मांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यातील मानले जाते. 35 x 28.25 इंच आकाराच्या या चित्रात भगवान श्रीकृष्ण आणि माता यशोदा यांच्या वात्सल्यपूर्ण नात्याचे अत्यंत भावपूर्ण चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये यशोदा माता गाईचे दूध काढत असताना, लहानगा कृष्ण खोडकरपणे दूध घेण्यासाठी हात पुढे करताना दिसतो. या दृश्यात मातृत्व, प्रेम आणि निरागसता यांचा सुंदर संगम दिसून येतो.
या चित्राचे विशेष म्हणजे, रवी वर्मांनी देवतांना केवळ दैवी स्वरूपात न दाखवता त्यांना मानवी भावनांसह साकारले. त्यामुळे प्रेक्षक आणि देवत्व यांच्यातील अंतर कमी झाले. याच शैलीमुळे त्यांच्या चित्रांना वेगळी ओळख मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.
राजा रवी वर्मा यांचा जन्म 1848 साली केरळमधील किलिमानूर येथे झाला. भारतीय चित्रकलेत युरोपीय तंत्र आणि भारतीय परंपरेचा संगम घडवून आणणारे ते पहिले महत्त्वाचे चित्रकार मानले जातात. हिंदू पुराणातील प्रसंगांचे वास्तववादी आणि भावपूर्ण चित्रण ही त्यांची खासियत होती. त्यांच्या चित्रांच्या छापील प्रती आजही अनेक घरांमध्ये देव्हाऱ्यात पाहायला मिळतात.
या विक्रीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. सायरस एस. पूनावाला यांनी सांगितले की, “या राष्ट्रीय ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भविष्यात हे चित्र जनतेसाठी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणार आहे.”
भारताच्या पुरातन वस्तू कायद्याअंतर्गत रवी वर्मा यांच्या चित्रांना राष्ट्रीय ठेव्याचा दर्जा असल्यामुळे ती देशाबाहेर निर्यात करता येत नाहीत. त्यामुळे अशा चित्रांची खरेदी केवळ भारतीय संग्राहकांनाच करता येते.
‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राची तुलना अनेकदा युरोपीय कलेतील ‘मॅडोना अँड चाइल्ड’ या विषयाशी केली जाते. आई आणि मुलामधील नातं जगभरातील कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. भारतातही कृष्ण आणि यशोदा यांची जोडी शतकानुशतके कला, साहित्य आणि भक्तीपरंपरेत महत्त्वाची ठरली आहे.
कला इतिहासकारांच्या मते, रवी वर्मांनी या चित्रात देवत्वाला मानवी रूप देत भावनांचा जिव्हाळा अधोरेखित केला आहे. त्यामुळे हे चित्र केवळ धार्मिक किंवा पौराणिक न राहता, सार्वत्रिक मानवी भावनांचे प्रतीक बनले आहे.
आजही त्यांच्या मूळ कलाकृती कला संग्राहक आणि रसिकांना आकर्षित करतात, आणि ही विक्री त्याच आकर्षणाची साक्ष देणारी ठरली आहे.

