(मुंबई)
तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना २ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार असून, ही शेवटची संधी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया २० मे २०२५ रोजी सुरू झाली होती. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठी २६ जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन ही मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात आली होती.
तथापि, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करूनही शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक वेळ मिळावा, या मागणीची दखल घेत DTE ने अंतिम तीन दिवसांची मुदतवाढ (२ ते ४ जुलै) दिली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
नोंदणीचा मोठा प्रतिसाद
३० जून २०२५ पर्यंत एकूण १,५८,८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १,३८,२९८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज निश्चित करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
CAP फेऱ्यांद्वारे प्रवेश
या वर्षी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) राबविण्यात येणार आहे. यामध्ये चार फेऱ्या असणार आहेत:
पहिली फेरी : प्रथम पसंतीक्रम
दुसरी फेरी : पहिले तीन पसंतीक्रम
तिसरी फेरी : पहिले सहा पसंतीक्रम
चौथी फेरी : सर्व पसंतीक्रम अनिवार्य
विद्यार्थ्यांनी योग्य व सुसंगत पसंतीक्रम भरून CAP फेऱ्यांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
अंतिम तारीख चुकवू नका!
पॉलिटेक्निक प्रवेशाची ही अंतिम संधी असून, फक्त २ ते ४ जुलै या कालावधीतच अर्ज करता येणार आहेत. अर्ज निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश अंतिम गुणवत्ता यादीत केला जाणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.