(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात अवैध एलईडी मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई करत रत्नागिरी जिल्ह्यातील ‘भुवनेश्वरी’ या मासेमारी नौकेला जप्त केले आहे. विनापरवाना मासेमारी करताना ही नौका आढळून आल्याने ती सर्जेकोट-मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत एलईडी प्रकाशझोताच्या साहाय्याने होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने गस्त आणि तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याच अनुषंगाने ३० मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास देवबाग समुद्र परिसरात गस्त घालत असताना ‘भुवनेश्वरी’ ही नौका संशयास्पद हालचाली करताना निदर्शनास आली. तपासणीदरम्यान संबंधित नौका किनाऱ्यापासून सुमारे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर बंदी असलेल्या एलईडी प्रकाशयंत्रणेद्वारे मासेमारी करत असल्याचे स्पष्ट झाले. विनापरवाना मासेमारीसह नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याने नौकेविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात आली. ही नौका महेश मनोहर आयरे (रा. शिरगाव, रत्नागिरी) यांच्या मालकीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नौकेवर तांडेलसह एकूण दोन खलाशी उपस्थित होते. कारवाईनंतर संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सिंधुदुर्गचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या मोहिमेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर आणि सावजी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार राज्यातील अनधिकृत मासेमारीविरोधात कठोर भूमिका अवलंबली जात असून, भविष्यातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर निर्णायक कारवाई सुरूच राहील, असे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी स्पष्ट केले.

