(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून तहसील प्रशासनाच्या कामकाजाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा तसेच स्वतःची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) अंतर्गत बदनामीचा गुन्हा नोंदविला आहे.
तहसीलदार म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हातखंबा येथील रहिवासी परशुराम मारुती कदम यांनी त्यांच्या वैयक्तिक समाजमाध्यम खात्यावर एक व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये खानू येथील योगिता यशवंत सुवारे यांनी धान्य लाभासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता, त्यांचे काम दोन वर्षे प्रलंबित होते आणि स्वतः हस्तक्षेप केल्यानंतर ते काम मार्गी लागले, असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच भविष्यात कोणाचेही काम अडल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले होते.
तहसीलदार म्हात्रे यांच्या मते, संबंधित व्हिडीओमधील मजकूरामुळे तहसील कार्यालयाच्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेबाबत जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. यामुळे शासकीय पदावर कार्यरत असताना आपल्या कामकाजाबाबत अनाठायी शंका निर्माण झाली असून, प्रतिमा धुळीस मिळाल्याची भावना त्यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांनी प्राथमिक चौकशीअंती भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

