(रत्नागिरी)
रत्नागिरी MIDC परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समाजसेवक एजाज इब्जी यांनी MIDC चे अभियंता पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गद्रे कंपनीजवळील बेशिस्त वाहतूक व पार्किंग, मोकाट गुरांचा उच्छाद आणि त्यातून होणारे वारंवार अपघात, तसेच शहरातील शहरी बसथांब्यांची मोडकळीस आलेली अवस्था या तातडीच्या प्रश्नांवर इब्जी यांनी लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी सांगितले की, रत्नागिरी शहरातील एस.टी. बसथांबे नुकतेच MIDC कडे वर्ग झाले असून त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत अभियंता पवार यांनी लवकरच योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. बैठकीनंतर एजाज इब्जी यांनी तातडीने प्रतिसाद दिल्याबद्दल अभियंता पवार यांचे आभार मानले.

