(दापोली)
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच यू. ए. दळवी इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष लियाकत रखांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक तोरसकर आणि पोलिस उपनिरीक्षक यादव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्धता आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असा संदेश दिला. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, तसेच चांगल्या मित्रपरिवाराची निवड करण्याबाबतही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक आणि संस्थेचे सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी जावेद मणियार, नाझीम काझी, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, मुख्याध्यापिका नुजहत रखांगे, एम. ई. एस. वूमन डिग्री कॉलेजचे प्राचार्य शहाबाज देशमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जमीर जमादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका शबाना मुल्ला यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

