(दापोली)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील ए.जी. हायस्कूलच्या माधव कोकणे सभागृहात तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन ए.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये दापोली तालुका समन्वयक व बहुजन हिताय विद्यामंदिर, आगरवायंगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यवान दळवी, तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व ए.जी. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, बुद्धिबळ स्पर्धा प्रमुख प्रशांत मोहिते, अनिरुद्ध रीसबुड, तसेच क्रीडा शिक्षक प्रदीप शिगवण, अमित वाखंडे, प्रथमेश दाभोळे, विकास पाटील, राजेंद्र देवकाते, वशीउल्ला दरवाजकर, कीर्तीराज नाचरे, सुहास नलावडे, मुबीन बामणे, शेखर पाटील यांच्यासह विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक, पालक आणि स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर तालुका समन्वयक सत्यवान दळवी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता :
-
१४ वर्षांखालील गट : मुलगे – ५६, मुली – ३३
-
१७ वर्षांखालील गट : मुलगे – ६२, मुली – १५
-
१९ वर्षांखालील गट : मुलगे – १४, मुली – ७
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमित वाखंडे यांनी तर उत्तम संयोजनाची जबाबदारी दापोली एज्युकेशन सोसायटीने पार पाडली. त्यांनी सभागृह व सर्व आवश्यक सुविधा पुरवून स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.