(दापोली/ रत्नागिरी)
तालुक्यातील जालगाव येथील चैतन्यनगर परिसरात बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली असून, शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त अश्विनी प्रसाद दातार (वय ६०) यांच्या ‘सोनचाफा’ या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी दातार या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असून, दापोलीतील त्यांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी २४ मार्च रोजी सकाळी पाच वाजून दहा मिनिटांपासून २७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या कालावधीत घरावर डोळा ठेवून प्रवेश केला. चोरट्यांनी घराच्या सेफ्टी डोअरचे तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी धारदार साधनाच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. चोरीचा उद्देश स्पष्ट दिसत असला तरी नेमकी किती वित्तहानी झाली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेची अधिकृत तक्रार ३० मार्च रोजी रात्री उशिरा दापोली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. परिसरातील वाढत्या घरफोडीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला गती दिली आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक हालचाली आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात असून, बंद घरांची सुरक्षा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दापोलीसारख्या शांत परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

