(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेत नोटीस बजावण्यात आलेल्या तब्बल १ कोटी २२ लाखांहून अधिक मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने मागवलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक पुरावे सादर केल्यामुळे यापैकी ९९.९४ टक्के मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान प्रारूप मतदार यादीतील नावांमध्ये विसंगती आढळलेल्या किंवा नाव चुकीचे असल्याचे निदर्शनास आलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. अशा एकूण १ कोटी २२ लाख २४ हजार ७ मतदारांकडून कागदपत्रे आणि आवश्यक पुरावे मागवण्यात आले होते. या नोटिसांना उत्तर देताना बहुतांश मतदारांनी निर्धारित वेळेत समाधानकारक कागदपत्रे सादर केली.
निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नोटीस बजावण्यात आलेल्या एकूण मतदारांपैकी १ कोटी २२ लाख १६ हजार ६६५ मतदारांची नावे पुन्हा प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ही संख्या एकूण नोटीस बजावलेल्या मतदारांच्या ९९.९४ टक्के इतकी आहे. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरलेल्या या मतदारांची नावे यादीत कायम ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
राज्यातील एसआयआर मोहिमेंतर्गत प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असलेल्या १ कोटी २२ लाख २४ हजार ७ मतदारांना आयोगाने पुन्हा नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक मतदारांनी नोटिसांना उत्तर देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. परिणामी, १ कोटी २२ लाख १६ हजार ६६५ मतदारांचा अंतिम मतदार यादीतील समावेश निश्चित होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम एसआयआर मतदार यादीकडे आता लक्ष लागले आहे.


