(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील काजरघाटी येथील चव्हाणवाडी परिसरात अंगणातील वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या तणावाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत ६३ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीसह त्यांचा मुलगा आणि सात महिन्यांची गर्भवती सुन जखमी झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरेश सिताराम चव्हाण हे आपल्या घरी असताना, त्यांच्या अंगणालगत न्यायप्रविष्ट असलेल्या जागेत आरोपी गुरुनाथ सिताराम चव्हाण आणि त्यांचा मुलगा त्रिनेत्र गुरुनाथ चव्हाण हे क्रॉकीट टाकत असल्याचे दिसून आले. या प्रकाराला सुरेश चव्हाण यांनी विरोध दर्शविल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. वाद चिघळल्यानंतर आरोपी गुरुनाथ चव्हाण यांनी कुदळीच्या लोखंडी पाईपच्या दांड्याने सुरेश चव्हाण यांच्या उजव्या हातावर, पाठीवर, कंबरेवर आणि डाव्या बाहूवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या झटापटीदरम्यान फिर्यादींचा मुलगा सुमित यालाही आरोपी त्रिनेत्र चव्हाण यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या धक्काबुक्कीत तो गडग्यावरून खाली पडल्याने त्याच्या पाठीला व पायाला दुखापत होऊन खरचटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती स्पृहा सुमित चव्हाण यांच्या पोटाला आरोपीच्या हातातील कुदळीचा दांडा लागल्याने त्या देखील जखमी झाल्या. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून रत्नागिरी शहर पोलिसांकडून पुढील तपास करत आहेत.

