(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन, मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर जुनिअर कॉलेजचे उपक्रमशील व दूरदृष्टीचे माजी मुख्याध्यापक, तत्कालीन रत्नागिरी जिल्हा व महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार विजेते कै. सदानंद बळीराम परकर आदर्श शिक्षक जिल्हा माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.
कै.सदानंद बळीराम परकर हे हाडाचे शिक्षक होते. शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.चार भिंतीच्या पलिकडे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम तळमळीने राबवले. त्यांच्या कर्तबगारीबद्दल त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, प्राप्त झाला होता. कै.सदानंद परकर यांच्या स्मरणार्थ मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रत्येक वर्षी कै. सदानंद बळीराम परकर जिल्हा आदर्श पुरस्कार दिला जातो.
शिक्षण संस्थेच्या मालगुंड-जाकादेवी- काजर्ली विद्यालयात शालेय गुणवत्ता वाढीसाठी सदानंद परकर यांच्या नावे इ.१०वी,१२ वी वर्गांसाठी १० ते १२ दिवसांचे विशेष अभ्यास प्रतिवर्षी शिबीर चालवले जाते. शिवाय कै. सदानंद बळीराम परकर कुटुंबियांच्या वतीने मालगुंड येथे शाळेला संलग्न एक मोठा प्रशस्त सभागृह बांधून दिला आहे. असे समाजप्रिय व्यक्तिमत्व, माजी मुख्याध्यापक कै.सदानंद परकर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सेक्रेटरी, मालगुंड एज्युकेशन सोसायटी, ता.जि. रत्नागिरी यांच्या नावे पाठवावेत असे आवाहन सेक्रेटरी विनायक राऊत (९४२३२९१०२८ )यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल, रोख रक्कम ५ हजार रुपये असे आहे. तरी इच्छुकांनी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

