(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ही साधी माणुसकीची जाणीवही हरपल्याचा संतापजनक प्रकार शहरातील मिरकरवाडा परिसरात समोर आला आहे. दोन तरुणांनी कुत्र्यांना चक्क दुचाकीला बांधून रस्त्यावरून फरफटत नेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून, या अमानुष कृत्यामुळे नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कामरान मजगावकर (रा. मिरकरवाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओत दोन तरुण कुत्र्यांना दुचाकीला बांधून ओढत नेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मुक्या जीवांचा अक्षरशः छळ सुरू असताना एका महिलेने धाडसाने या तरुणांना जाब विचारला. “कुत्र्यांना अशा प्रकारे फरफटत नेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे,” अशा शब्दांत तिने त्यांना सुनावले. मात्र, आपल्या कृत्याचा जाब देण्याऐवजी संबंधित तरुणांनी महिलेशी हुज्जत घालत आरडाओरड आणि शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसून येते. मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती समाजासाठी तितकीच चिंताजनक आहे. प्राण्याला वेदना होत नाहीत, त्याला त्रास समजत नाही किंवा तो प्रतिकार करू शकत नाही, या समजुतीतून त्याच्यावर अत्याचार करण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. माणूस म्हणून मिळालेली संवेदनशीलता बाजूला ठेवून मुक्या जीवाला रस्त्यावर फरफटत नेणे ही केवळ क्रूरता नव्हे, तर माणुसकीलाच काळिमा फासणारी बाब आहे.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमींनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कारवाईला वेग आला असला, तरी अशा घटना केवळ संताप व्यक्त करून थांबू नयेत. मुक्या जीवांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे आणि दोषींवर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा, माणुसकीची परीक्षा घेणाऱ्या अशा घटना पुन्हा घडत राहतील.


