( मुंबई )
राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांसाठी उन्हाळी सुटी आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना 2 मे 2026 पासून उन्हाळी सुटी लागू होणार असून, नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 15 जून रोजी राज्यभर एकाच दिवशी शाळा सुरू होणार आहेत.
शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचना
ही माहिती शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक) आणि डॉ. महेश पालकर (माध्यमिक शिक्षण संचालक) यांनी परिपत्रकाद्वारे विभागीय आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिली आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टी आणि शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात एकसमानता राखण्यावर भर देण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना 2 मेपासून उन्हाळी सुटी लागू होईल. मात्र, इतर शिक्षण मंडळांच्या शाळांना त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. सन 2026-27 साठी राज्यभरातील सर्व विभागांतील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भाचाही समावेश असून, यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात एकसमान वेळापत्रक लागू होणार आहे.
उष्णतेमुळे सकाळच्या सत्रात शाळा
जूनमधील उष्णता लक्षात घेऊन 15 जून ते 29 जून या कालावधीत शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत चालवण्याचे निर्देश आहेत. त्यानंतर 30 जूनपासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील. पूर्वी विदर्भातील प्रखर उष्णतेमुळे तेथील शाळा इतर विभागांपेक्षा 8 ते 10 दिवस उशिरा सुरू केल्या जात होत्या. मात्र, यंदा हा फरक दूर करत राज्यभर एकसमान सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही उष्णतेचा विचार करून सकाळच्या सत्रात शाळा घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वेळापत्रक अधिक सुसंगत होणार असून, सर्व विभागांमध्ये एकसमानता येणार आहे. तसेच उष्णतेचा विचार करून घेतलेल्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार करण्यात आला आहे.

