( नवी दिल्ली )
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. या पासची किंमत फक्त ३ हजार रुपये असून, यामुळे देशभरात टोल बिनधास्तपणे भरता येणार आहे.
वार्षिक पास काय आहे?
गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार, हा वार्षिक पास फास्टॅग प्रणालीशी संलग्न असणार असून, ३ हजार रुपयांमध्ये एक वर्षासाठी किंवा २०० ट्रिप प्रवासांपर्यंत (जे आधी येईल ते लागू) वैध असेल. हा पास खासगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन करण्यात आला आहे आणि तो देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर लागू असेल.
पास सक्रिय/नूतनीकरण करण्यासाठी लवकरच NHAI/MoRTH वेबसाइट आणि ‘हायवे ट्रॅव्हल’ अॅपवर स्वतंत्र लिंक उपलब्ध होणार असून, प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक ठेवली जाणार आहे.
या उपक्रमामागचा उद्देश काय?
या वार्षिक पास धोरणाचा मुख्य उद्देश ६० किमीच्या परिघातील टोल प्लाझांवरील तक्रारी कमी करणे, ट्रॅफिक सुलभ करणे, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, वादांचे प्रमाण कमी करणे आणि टोल नाक्यावरील प्रतीक्षा वेळ घटवणे हा आहे.
खासगी वाहनांचा टोलमध्ये वाटा
२०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ५५ हजार कोटी रुपयांचा टोल महसूल जमा झाला. यामध्ये खासगी कारकडून केवळ ८ हजार कोटी रुपये मिळाले. टोल प्लाझांवरून जाणाऱ्या वाहनांपैकी ५३ टक्के खासगी वाहने असूनही त्यांचा महसूलातील वाटा फक्त २१ टक्के इतका आहे. विशेषतः सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ६० टक्के वाहतूक खासगी गाड्यांची असते, तर व्यावसायिक वाहने दिवस-रात्र महामार्गांवर धावत असतात, असे विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.
फास्टॅग वार्षिक पास कुठे मिळणार?
हा पास NHAI FASTag पोर्टल, फास्टॅग जारी करणाऱ्या बँका, तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करता येईल. पाससाठी अर्ज करताना वाहन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक असेल.
फायदे :
- टोल प्लाझांवर सहजतेने प्रवेश
- एकाच व्यवहारात वर्षभराचा टोल
- टोलवर होणारी गर्दी आणि वाद कमी
- प्रवासात वेळेची बचत
- टोल व्यवहारांचे डिजिटायझेशन