(मुंबई)
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक ‘Eye-Tracking’ कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रगत कॅमेर्यांच्या मदतीने वाहनचालकांच्या डोळ्यांच्या बुब्बुळांमधील बदल तपासून ते मद्यधुंद आहेत का, हे ओळखता येणार आहे.
‘मिसिंग लिंक’वर विशेष भर
द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर या मार्गाची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या सुमारे 80 हजार पीसीयू (प्रवासी वाहन युनिट) क्षमतेचा हा मार्ग रुंदीकरणानंतर 1.65 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसे काम करतात हे कॅमेरे?
- मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या बुब्बुळांचा आकार आणि प्रकाशाला देणारा प्रतिसाद बदलतो.
- कॅमेरे बुब्बुळांची हालचाल, आकार आणि रिफ्लेक्शनचे विश्लेषण करतात.
- या डेटाच्या आधारे चालकाने अल्कोहोल सेवन केले आहे का, याचा अंदाज लावला जातो.
- चालकाला थांबवून ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्याची गरज कमी होणार आहे.
द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘स्पीड गन’ कॅमेरे आधीच बसविण्यात आले आहेत. कमाल वेगमर्यादा ताशी 100 किमी ठेवण्यात आली असून, त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. वाहनाने संपूर्ण मार्ग पार करण्यासाठी घेतलेल्या वेळेच्या आधारेही वेगमर्यादा उल्लंघनावर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे नियमभंग करणाऱ्या चालकांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या तंत्रज्ञानामुळे मद्यधुंद वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील हा अत्याधुनिक उपक्रम रस्ते सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, भविष्यात इतर महामार्गांवरही असे तंत्रज्ञान लागू होण्याची शक्यता आहे.

