(नाशिक / वार्ताहर)
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील रामकुंड परिसरात ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेने या सोहळ्याचा प्रारंभ होणार असून, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर महाध्वजारोहण आणि गोदाआरती होणार आहे. या मुख्य सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आणि विविध आखाड्यांचे प्रमुख श्रीमहंत उपस्थित राहणार आहेत.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सिंहस्थ समितीचे विश्वस्त सतीश शुक्ल आणि आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी याबाबतची माहिती दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह विविध प्रशासकीय कार्यक्रमांचाही समावेश आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सोहळ्याच्या अनुषंगाने २५ ऑक्टोबर रोजी सामूहिक शंखनादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन असे कार्यक्रमही पार पडणार आहेत. सायंकाळी गोदावरी नदीची आरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणारे महाध्वजारोहण आणि गोदाआरती हे या तीन दिवसीय सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.


