(मालवण / वार्ताहर)
किल्ले सिंधुदुर्गच्या मागील खडकाळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्याने उलटल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दांडी येथील मच्छीमार तथा भाजपचे स्थानिक पदाधिकारी सन्मेष सुरेश परब (वय ४९) आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे (वय ३०) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग सन्मेष परब (वय २२) याला स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत सुखरूप बाहेर काढले.
सन्मेष परब, अक्षय राणे आणि सुयोग परब हे तिघे ‘सागरिका’ या मासेमारी पातीने किल्ले सिंधुदुर्गलगतच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. सकाळी सहा वाचण्याच्या सुमारास किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या खडकाळ भागात अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्याने पात समुद्रात पलटी झाली. त्यामुळे तिघेही समुद्रात फेकले गेले.
या अपघाताचा प्रसंग अत्यंत क्लेशदायक आणि हृदय पिळवटून टाकणारा होता. नौका बुडू लागताच तिघांनीही जीव वाचवण्यासाठी पाण्यात हातपाय मारण्यास सुरुवात केली. सन्मेश परब यांचा मुलगा सुयोग याने स्वतःचा बचाव करण्यासोबतच वडिलांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्राच्या प्रचंड लाटांपुढे त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. सुयोगच्या डोळ्यांदेखतच त्याचे वडील सन्मेश परब आणि खलाशी अक्षय राणे समुद्राच्या पाण्यात बुडाले. डोळ्यांसमोर वडिलांना समुद्रात बुडताना पाहण्याचा हा प्रसंग सुयोगसाठी अत्यंत वेदनादायी ठरला. लाटांचा प्रचंड वेग आणि समुद्राची तीव्रता यामुळे त्याला इच्छा असूनही वडिलांना वाचवता आले नाही.
दरम्यान, सुयोग परब पाण्यात पोहत असताना जवळच असलेल्या जयदेव लोणे यांच्या नौकेतील मच्छीमारांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने सुयोगला आपल्या नौकेवर घेत त्याचा जीव वाचवला. मात्र, सन्मेष परब आणि अक्षय राणे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच सन्मेष परब यांचा मृतदेह किल्ल्यानजीकच्या समुद्रात आढळून आला. त्यानंतर अक्षय राणे यांचाही मृतदेह शोधण्यात यश आले. दोन्ही मृतदेह किनाऱ्यावर आणून मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मृत सन्मेष परब हे दांडी येथील भाजपचे सक्रिय पदाधिकारी असून मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब यांचे पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहिणी असा परिवार आहे. सन्मेष परब आणि अक्षय राणे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने दांडी तसेच मालवण शहर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील आणि करिश्मा चिंदरकर यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या दुर्घटनेचे वृत्त समजताच विविध लोकप्रतिनिधी आणि मच्छीमार बांधवांनीही किनाऱ्यावर तसेच रुग्णालयात धाव घेतली.

