(नवी दिल्ली)
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBEMS) यांनी पदव्युत्तर वैद्यकीय (NEET PG) आणि पदव्युत्तर दंत (NEET MDS) अभ्यासक्रमांसाठीच्या नीट परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. जाहीर वेळापत्रकानुसार नीट-पीजी परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी, तर नीट एमडीएस परीक्षा २ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या दोन्ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे.
नीट एमडीएस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी ३१ मे २०२६ पर्यंत आंतरवासिता (इंटर्नशिप) पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नीट-पीजी परीक्षेसाठी आंतरवासिता पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या या तारखा संभाव्य स्वरूपाच्या असून, अंतिम व सविस्तर माहितीसाठी अधिकृत माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही माहिती पुस्तिका राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
तसेच परीक्षा संदर्भातील कोणत्याही शंका, तक्रारी किंवा स्पष्टीकरणासाठी उमेदवारांनी एनबीईएमएसच्या अधिकृत कम्युनिकेशन पोर्टलला नियमितपणे भेट द्यावी, असेही परीक्षा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

